Friday, March 3, 2017

शोध कशाचा घ्यावा?



तथागत भगवान बुद्ध - शोध कशाचा घ्यावा?

  २५ फेब्रुवारी २०१७, पुणे

 

पार्श्वभूमी
बौद्ध तिपिटकातील सुत्त पिटकामध्ये मज्झिम निकाय हा मध्यम लांबीच्या तथागत बुद्धांच्या शिकवणुकींचा एक संग्रह आहे. ह्यात २६वे सुत्त हे 'पासरासिसुत्त' ह्या नावाने प्रसिद्ध आहे. 'पासरासि' हा एक पाली भाषेतील शब्द असून 'पास' म्हणजेच 'पाश' किंवा 'बंधन' आणि 'रासि' म्हणजे 'राशी' किंवा 'ढीग'. ह्याच पाली सुत्ताला 'अरियपरियेसनसुत्त' असेही म्हटले जाते. ह्या ठिकाणी 'अरिय' ह्या पाली शब्दाचा अर्थ 'आर्य' किंवा 'उच्च/महान' आणि 'परियेसन' म्हणजे संस्कृतमध्ये 'पर्येषण' किंवा मराठीत 'शोध' असे समजावे. ह्या पासरासि किंवा अरियपरियेसनसुत्तामध्ये तथागत भगवान बुद्धांनी माणसाने नेमका कशाचा शोध घ्यावा ह्याचा विवेक समजावून दिला आहे. ह्या सुत्ताच्या प्राथमिक देशनेनंतर (देशना म्हणजे शिकवणूक) भगवानांनी उदाहरणार्थ त्यांची स्वतःची चर्या, जी त्यांना बोधिसत्वावस्थेमधून सम्यक सम्बोधिपर्यन्त घेऊन गेली, तिचे तपशीलवार वर्णन केले आहे. लेखाच्या पुढील भागात त्याचा आढावा घेऊ.

देशना 
भगवान बुद्धांनी ह्या सुत्तामध्ये दोन प्रकारच्या शोधांची शिकवणूक दिली आहे. पाली सुत्तांचे असे एक वैशिष्ट्य लक्षात घेतले पाहिजे की, भगवान एखाद्या शिकवणूकीचा पूर्ण परिणाम होण्यासाठी प्रथम मानवी जीवनातील कष्टमय, दु:खदायी परिस्थितीचे वर्णन करतात. तदनंतरच खरी शिकवणूक प्रस्तुत केली जाते. ह्याच वैशिष्ट्याप्रमाणे ह्या सुत्तामध्ये प्रथम तथागत 'अनरिया परियेसना' म्हणजे 'अनार्य शोध' किंवा जो शोध माणसाने करू नये त्याचे विश्लेषण करतात. त्यानंतर मग त्यांची खरी देशना 'अरिया परियेसना' अर्थात 'आर्य/उच्च/महान' शोध' किंवा ज्याचा शोध करावा, ती प्रकट होते.


अनार्य शोध - अनरिया परियेसना

ज्या गोष्टींचा शोध/खटाटोप करू नये अशा कुठल्या गोष्टी भगवान बुद्धांना अभिप्रेत आहेत?

.
अत्तना जातिधम्मो समानो जातिधम्मं येव परियेसति।
जन्माला येण्याचा आपला स्वभाव असून त्यासंबंधित गोष्टींचाच शोध घेणे.
.
अत्तना जराधम्मो समानो जराधम्मं येव परियेसति।
वृद्धावस्थेचा आपला स्वभाव असून त्यासंबंधित गोष्टींचाच शोध घेणे.
.
अत्तना ब्याधिधम्मो समानो ब्याधिधम्मं येव परियेसति।
शारीरिक आणि मानसिक व्याधींचा आपला स्वभाव असून त्यासंबंधित गोष्टींचाच शोध घेणे.
.
अत्तना मरणधम्मो समानो मरणधम्मं येव परियेसति।
मरण पावण्याचा आपला स्वभाव असून त्यासंबंधित गोष्टींचाच शोध घेणे.
.
अत्तना सोकधम्मो समानो सोकधम्मं येव परियेसति।
शोकदग्ध होण्याचा आपला स्वभाव असून त्यासंबंधित गोष्टींचाच शोध घेणे.
.
अत्तना सङ्किलेसधम्मो समानो सङ्किलेसधम्मं येव परियेसति।
अशुद्धतेचा आपला स्वभाव असून त्यासंबंधित गोष्टींचाच शोध घेणे.

थोडक्यात, जाति (जन्म) -> जरा (वार्धक्य) -> ब्याधि (शारीरिक आणि मानसिक त्रास) -> मरण (मृत्यु) -> सोक (शोक) -> सङ्किलिट्ठ (अशुद्धतेने रंजित) अशा भवचक्रात मनुष्य स्वःताला गुंफून घेतो आणि आपल्या सुखांचा शोध फक्त ह्या चक्रातच शोधायचा वृथा प्रयत्न करत राहतो.
 
ह्यापुढे, जातिधम्म, जराधम्म, ब्याधिधम्म, मरणधम्म, सोकधम्म . म्हणजे पुत्तभरियं (पुत्र आणि पत्नी), दासिदासं (नोकरचाकर), अजेळकं (बकरी, शेळी .), कुक्कुटसूकरं (कोंबड्या, डुकरे .), हत्थिगवास्सवळव (हत्ती, गाय, घोडे, बैल), जातिरूपरजतं (सोने आणि चांदी). म्हणजेच, ज्या सर्व गोष्टी सामान्य माणसाला हव्याहव्याशा वाटतात त्या अनार्य आहेत, त्यात माणसाने जरूरीपेक्षा जास्त अडकून पडू नये. अशा अनार्य अवस्थेला बुद्ध 'गथित' म्हणजे 'बांधलेले' किंवा संकुचित आणि 'मुच्छित' म्हणजे 'मूर्च्छित' किंवा संभ्रमित/भोवळ आलेले असे म्हणतात. ह्या सर्व गोष्टींना भगवान बुद्ध उपाधीची संज्ञा देतात. उपाधीचा अर्थ ज्याचे वेगळे अस्तित्व नाही आणि जी गोष्ट किंवा पदार्थ दुसऱ्या पदार्थाचा आधार घेऊन अस्तित्व राखते ती होय. आपल्या सृष्टीतील सर्वच गोष्टींचे खरे स्वरूप हे उपाधि हेच असल्याने त्यांची फक्त व्यावहारिक सत्यता आहे आणि कायमस्वरूपी असे कुठलेच अस्तित्व नाही असे ह्यातून समजावे. बौद्ध धर्माच्या अनात्मतेचा हा गाभा आहे आणि असे अस्तित्व की जे केवळ दुसऱ्या कशाच्या तरी आधारावर अवलंबून आहे त्याला बुद्धांची प्रतीत्यसमुत्पाद (पाली - पटिच्चसमुप्पाद) शिकवणूक समजतात. प्रतीत्यसमुत्पाद हे एक गंभीर असे बौद्ध तत्व असून त्यावर एका वेगळ्या लेखात त्यावर विचार करू.

आर्य शोध - अरिया परियेसना

माणसाने स्वतःला कुठे शोधावे म्हणजे तो जाति-जरा-मरण अशा भवचक्रातून त्याची मुक्तता होईल ह्याला भगवान बुद्ध 'अरिय परियेसना' किंवा 'योग्य शोध' असे म्हणतात. हा शोध प्रत्येकाने घेऊन स्वतःला मुक्त करावे असे त्यांचे सांगणे आहे. काय आहे हा आर्य शोध?

.
अत्तना जातिधम्मो समानो जातिधम्मे आदीनवं विदित्वा अजातं अनुत्तरं योगक्खेमं निब्बानं परियेसति
.
अत्तना जराधम्मो समानो जराधम्मे आदीनवं विदित्वा अजरं अनुत्तरं योगक्खेमं निब्बानं परियेसति।
.
अत्तना ब्याधिधम्मो समानो ब्याधिधम्मे आदीनवं विदित्वा अब्याधिं अनुत्तरं योगक्खेमं निब्बानं परियेसति।
.
अत्तना मरणधम्मो समानो मरणधम्मे आदीनवं विदित्वा अमतं अनुत्तरं योगक्खेमं निब्बानं परियेसति।
.
अत्तना सोकधम्मो समानो सोकधम्मे आदीनवं विदित्वा असोकं अनुत्तरं योगक्खेमं निब्बानं परियेसति।
.
अत्तना सङ्किलेसधम्मो समानो सङ्किलेसधम्मे आदीनवं विदित्वा असङ्किलिट्ठं अनुत्तरं योगक्खेमं निब्बानं परियेसति।

वरील पाली वाक्यांमधील महत्वाचे शब्द आहेत - 'आदीनवं विदित्वा' आणि 'अजातं (अजरं/अब्याधिं/अमतं .) अनुत्तरं योगक्खेमं निब्बानं'. 'आदीनवं' ह्याचा अर्थ आहे 'दोष' किंवा 'कमीपणा'. 'विदित्वा' म्हणजे 'समजावून घेऊन'. जन्म-वार्धक्य-मरण हे चक्र त्यातील प्रत्येक धर्माला ते दोषपूर्ण आहेत. त्यामध्ये काहीतरी कमीपणा आहे, हे सर्व धर्म क्षणभङ्गुर आहेत, तत्कालिक आहेत, ह्या प्रकारे समजावून घेतले पाहिजेत. 'निब्बान' म्हणजे 'निर्वाण' म्हणजेच सुखदुःखापासूनची संपूर्ण मुक्तावस्था. ह्याच सर्वोच्च अवस्थेला अनुत्तर (ज्यापलीकडे अशी कुठलीच अवस्था नाही), योगक्खेम (संपूर्णावस्था) अशी वेगवेगळी विशेषणे लावून तोच खरा आर्य शोध आहे, अशी देशना तथागत भगवान बुद्धांनी दिली आहे. हे निर्वाण अजात ( जन्मलेले), अजर (जीर्ण होणारे), अब्याधि (त्रासदायक नसलेले), अमत (मृत पावणारे), असोक (शोकरहित) आणि असङ्किलिट्ठ (शुद्ध) असे आहे आणि मनुष्याने त्याचाच शोध घ्यावा असा अर्थ भगवान बुद्धांना अभिप्रेत आहे.

तात्पर्य
भगवान बुद्धांच्या शिकवणुकीची मूळ तत्वे ही चार आर्यसत्यांवर आधारित आहेत. त्यातील 'दुःख' हे प्रथम आर्यसत्य आहे. दुःख हे कोणालाच नको असते पण त्याला ते टाळायचे कसे हे उमजत नाही. ह्या सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी मानवी जीवनातील जन्म-वार्धक्य-व्याधि-मरण-शोक अशा अवस्थांमध्ये सामान्यतः माणूस कसा अडकून पडतो पण त्याच अवस्था क्षणिक आहेत, कायमच्या नाहीत. त्यांतील दोष लक्षात घेऊन आपण ह्याच अवस्थांपुरतेच मर्यादित आहोत, असे समजता चांगल्या वाईट शोधांचा विवेक साधावा अशी देशना दिली आहे. भगवान बुद्धांच्या स्वत:च्या आर्य शोधासंबंधी पुढील लेखात भाषांतर प्रस्तुत करू.

-         समाप्त -
 

1 comment: