तथागत भगवान बुद्धांचा आर्य शोध - भाग २
५ मार्च २०१७, पुणे
पार्श्वभूमी
ह्या लेखामध्ये पासरासिसुत्ताच्या भाषांतराचा पुढील भाग
प्रस्तुत केला आहे. मागील भागाचा आढावा
घ्यायचा झाला तर त्यात बोधिसत्वावस्थेतील गौतमांना निर्वाणाची ओढ निर्माण होऊन
त्यासाठी त्यांनी केलेल्या गृहत्यागापासून ते त्यांच्या उरूवेला गावच्या
प्रवासापर्यंतचे वर्णन आले आहे. ह्या
प्रवासादरम्यान त्यांनी केलेले दोन गुरु - आळार कालाम आणि उद्दक रामपुत्त, त्या गुरूंनी केलेला समाधिमार्गाचा उपदेश आणि तो निर्वाणासाठी योग्य न
वाटल्याने गौतमांनी धरलेली दुसरी वाट ह्याचे सुत्तातील वर्णन आत्तापर्यंत आपण
वाचले. त्यापुढील भाषांतरित वर्णन
पुढीलप्रमाणे -
भाषांतर
“भिक्खुहो, मी
तिथे (उरूवेला गावी) स्वतःला जातिधर्मी मानून त्यात काय दोष आहेत ते जाणून घेतले
आणि अनुत्तर,
अजात अशा निर्वाणाचा अनुभव घेतला, स्वतःला
जराधर्मी मानून त्यात काय दोष आहेत ते जाणून अनुत्तर, अजर
अशा,
स्वतःला व्याधिधर्मी मानून त्यात काय दोष आहेत ते जाणून
अनुत्तर ब्याधिमुक्त, स्वतःला मरणधर्मी मानून त्यात काय दोष आहेत
ते जाणून अनुत्तर, अमर, स्वतःला
शोकधर्मी मानून त्यात काय दोष आहेत ते जाणून अनुत्तर, अशोक
आणि स्वतःला असङ्क्लिष्ट मानून त्यात काय दोष आहेत ते जाणून अनुत्तर, असङ्क्लिष्ट अशा निर्वाणाचा लाभ घेतला. त्या वेळेला मला असे ज्ञान उत्पन्न झाले - 'माझी
मुक्ति ही अचल (न ढळणारी) आहे, हा माझा अंतिम जन्म आहे, आता मला पुनर्जन्म नाही.'
"भिक्खुहो, तेव्हा माझ्या मनात असा विचार आला - 'मी अतिशय गंभीर, साक्षात्कारासाठी दुष्प्राप्य, शांत, तर्कापासून दूर (तर्काच्या कक्षेत न येणारा), निपुण आणि पंडितांसाठी योग्य अशा धर्माची प्राप्ती केली आहे. ही सर्व प्रजा (लोक) मात्र कामतृष्णेमध्येच मग्न आहेत, त्यातच ते प्रसन्न आहेत. हा माझा धर्म जो एकमेकांवर आधारित अशा अस्तित्वाचा 'प्रतीत्यसमुत्पाद', तो ह्या कामतृष्णेत
मग्न आणि कामतृष्णेत आनंदी असलेल्या प्रजेला समजायला अतिशय अवघड आहे. माझा हा धर्म सर्व संस्कार (एकत्रित आलेल्या क्षणिक गोष्टींचा
समूह) नष्ट करणारा, सर्व उपाधींचा (ज्या
गोष्टींची फक्त व्यावहारिक सत्यता आहे) विसर्ग करणारा, सर्व कामतृष्णेचा क्षय करणारा आणि वैराग्याचे उत्पादन करणारा असा आहे. मी जर माझा हा धर्म कुणाला दिला आणि तो त्याला समजला नाही
तर ते माझेच वैगुण्य असेल, ते मला त्रासदायक ठरेल. त्या वेळी भिक्खुहो, ह्या
पूर्वी कधीही न ऐकलेल्या गाथा मी उद्गारल्या –
कष्टाने केलेला प्राप्त, कसा करू प्रकाशित
|
“भिक्खुहो, अशा
माझ्या भावनेमुळे माझे चित्त लोकांना धर्मोपदेश न देण्याकडे झुकू लागले. तेव्हा भिक्खुहो, ब्रह्मा सहम्पतिने माझ्या मनातले (विचार) ओळखून विचार केला - 'अरे,
जर सम्मासम्बुद्ध तथागत भगवान धर्मोपदेशाकडे वळले नाहीत तर
संसार नष्ट होईल, त्याचा विनाश होईल’. तेव्हा भिक्खुहो, ब्रह्मा सहम्पति ब्रह्मलोकामधून अन्तर्धान
पावून माझ्यासमोर उपस्थित झाला. ब्रह्मा
सहम्पतिने आपले खांद्यांवरील वस्त्र सावरित आणि ठीक करत मला हात जोडून प्रणाम केला
आणि म्हणाला – ‘भन्ते, भगवान, सुगत,
आपण आपला धर्म द्यावा (शिकवावा). जगात असे पण लोक आहेत की जे अल्पविकारी आहेत, ज्यांना
निर्वाणाची ओढ आहे परंतु त्यांना योग्य धर्मोपदेश न मिळाल्याने ते भवसागरात बुडत
आहेत.
आपण उदास न व्हावे, भविष्यात जिज्ञासु लोकही
आपणांस भेटतील’. भिक्खुहो, असे म्हणून ब्रह्मा सहम्पति पुढे म्हणाला –
‘विकारी झाले मगधजन पूर्वी, अशुद्ध-रंजित अशा धर्माने उघडले
अमृताचे द्वार आता, ऐकावा
त्यांनी विमलधर्म पर्वतशिखरे
बसूनि जसे,
बघे तसे जनां चहूकडे
तसेच
हे सुमेध,
हे चक्षुधर, चढून ह्या धर्मशिखरी
करावे
अवलोकन हे वीतशोक, शोकावतीर्ण असे हे जन
दे
तुझा धर्म,
भेटतील तुला पांथस्थ’.
|
"भिक्खुहो, ब्रह्माचा अभिप्राय समजून मी माझ्या बुद्धचक्षुंनी करूणेने
सर्व जगाकडे बघितले. मी हे बघितले भिक्खुंनो की, काही लोक कमी विकारी आहेत तर काही जास्त, काहींची इन्द्रिये तीक्ष्ण तर काहींची मृदु, काही सुंदर स्वभावाचे तर काही वाईट, काही सुविद्य तर काही अविद्य, काही
असे की ज्यांना परलोकाचे भय आहे तर काही असे की ज्यांना परलोकाचे अजिबात भय वाटत
नाही. जशी कमळाची काही पुष्पे
पाण्यात जन्मून,
तिथेच वाढून पाण्याच्या थोडेच वरपर्यन्त वाढून पाण्याच्या
पातळीतच मग्न राहतात, कमळाची काही पुष्पे पातळीपासून अजून
वरपर्यन्त वाढतात व तिथेच राहतात तर काही पुष्पे मात्र खूप वरपर्यन्त वाढून नंतर
तिथेच पाण्यातच गळून पडतात, तसेच
मी भिक्खुहो,
बुद्धचक्षुंनी सर्व जगाकडे बघत, त्याचे
अवलोकन करत काही लोक कमी विकारी तर काही जास्त, काही
तीक्ष्ण इन्द्रियांचे तर काही मृदु, काही सुंदर स्वभावाचे तर काही
वाईट,
काही सुविद्य तर काही अविद्य, काही
असे की ज्यांना परलोकाचे भय वाटते तर काही असे की ज्यांना परलोकाचे भय वाटत नाही
असे लोक बघितले[4]. ते बघून मग मी ब्रह्मा सहम्पतिला म्हटले –
‘बंद आहे हे अमृताचे द्वार, असे ज्यांस नाही श्रद्धा
प्रणीत
प्रगुण असे हा धर्म कष्टदायी, उपेक्षिले
आधी म्हणूनि जनां मी’.
"भिक्खुहो, तेव्हा ब्रह्मा सहम्पति 'भगवानांनी माझे ऐकले, ते
धर्मदेशनेसाठी तयार झाले' असा
विचार करून मला अभिवादन करून तिथून अन्तर्धान पावला.”
तात्पर्य
पासरासिसुत्त इथेच संपत नाही. ह्यानंतर,
सुत्तामध्ये बुद्धधर्माचे प्रवर्तन म्हणजेच ज्याला
धर्मचक्रप्रवर्तन (पाली - धम्मचक्कपवत्तन) असे म्हणतात, ते
येते. बुद्धप्रवचित असे हे महत्वाचे सुत्त एका वेगळ्या
लेखामध्ये भाषांतरित करू. इथवरच्या
भाषांतरातून तथागतांच्या बोधिसत्वावस्थेपासून त्यांच्या निर्वाणप्राप्तीपर्यन्तच्या
प्रवासाचे वर्णन आपण बघितले.
लोकांना निर्वाणप्राप्तीचा उपदेश देतांना तो स्वतःच्या उदाहरणाने प्रकाशित करून त्यात
तथागतांनी मार्गदर्शन केले आहे.
बोधिवृक्षाखाली केलेल्या ध्यानसाधनेचे वर्णन ह्या सुत्तामध्ये तसे कमीच आले आहे पण
त्याचे सविस्तर असे वर्णन तिपिटकामध्ये अनेक ठिकाणी आहे. ह्या ठिकाणी एवढेच महत्वाचे आहे की,मनुष्याने स्वतःला
जाति-जरा-मरणधर्मी इतकेच न मानून त्यातील त्रुटी लक्षात घेऊन सर्वक्षेम
निर्वाणासाठी झटले पाहिजे.
समाप्त
[2] स्त्रोत - प्रचलित धर्म, चालू शिकवण ह्या अर्थी
[3] सार्थवाह - मार्गदर्शक ह्या अर्थी
[4] कमलपुष्पाचे उदाहरण हे वेगवेगळ्या स्वभावाचे, धार्मिक प्रवृत्तिंचे लोक दर्शवितात
तात्पर्य
पासरासिसुत्त इथेच संपत नाही. ह्यानंतर,
सुत्तामध्ये बुद्धधर्माचे प्रवर्तन म्हणजेच ज्याला
धर्मचक्रप्रवर्तन (पाली - धम्मचक्कपवत्तन) असे म्हणतात, ते
येते. बुद्धप्रवचित असे हे महत्वाचे सुत्त एका वेगळ्या
लेखामध्ये भाषांतरित करू. इथवरच्या
भाषांतरातून तथागतांच्या बोधिसत्वावस्थेपासून त्यांच्या निर्वाणप्राप्तीपर्यन्तच्या
प्रवासाचे वर्णन आपण बघितले.
लोकांना निर्वाणप्राप्तीचा उपदेश देतांना तो स्वतःच्या उदाहरणाने प्रकाशित करून त्यात
तथागतांनी मार्गदर्शन केले आहे.
बोधिवृक्षाखाली केलेल्या ध्यानसाधनेचे वर्णन ह्या सुत्तामध्ये तसे कमीच आले आहे पण
त्याचे सविस्तर असे वर्णन तिपिटकामध्ये अनेक ठिकाणी आहे. ह्या ठिकाणी एवढेच महत्वाचे आहे की,मनुष्याने स्वतःला
जाति-जरा-मरणधर्मी इतकेच न मानून त्यातील त्रुटी लक्षात घेऊन सर्वक्षेम
निर्वाणासाठी झटले पाहिजे.
समाप्त
[2] स्त्रोत - प्रचलित धर्म, चालू शिकवण ह्या अर्थी
[3] सार्थवाह - मार्गदर्शक ह्या अर्थी
[4] कमलपुष्पाचे उदाहरण हे वेगवेगळ्या स्वभावाचे, धार्मिक प्रवृत्तिंचे लोक दर्शवितात
🙏🙏🙏
ReplyDeleteअतिशय उत्तम
ReplyDeleteमौल्यवान