तथागत भगवान बुद्धांचा आर्य शोध - भाग १
३ मार्च २०१७, पुणे
पार्श्वभूमी
मागील लेखामध्ये मज्झिम निकायामधील 'पासरासी'
किंवा 'अरियपरियेसन' सुत्तातील बुद्धांच्या शिकवणुकीचा विचार केल्यावर त्याच सुत्तामधील उर्वरित
भागामध्ये तथागत बुद्ध आर्य शोधाचे उदाहरण म्हणून स्वतःच्या चर्येचे जे वर्णन
करतात त्याकडे वळू. त्यांच्या
बोधिप्राप्तीपूर्वीच्या अवस्थेमध्ये त्यांना 'बोधिसत्व' असे म्हटले जाते. 'बोधिसत्व' म्हणजे असे सत्व (जीव) की जो संपूर्ण बोधि प्राप्त करून घेण्यासाठी मार्गस्थ
आहे. 'बुद्धत्व' हेच संपूर्णत्व आणि ते अनेक जन्मांमधून जाऊन शेवटी जो मिळवतो तो बोधिसत्वातून
बुद्धत्वाला प्राप्त करतो.
अर्थातच,
'बोधिसत्व' बुद्ध होण्याच्या मार्गावरील
एक अवस्था आहे,
हे लक्षात घेतले पाहिजे. ह्या आणि पुढील काही लेखांमध्ये ह्या पासरासिसुत्ताचे शब्दशः भाषांतर प्रस्तुत
करत आहे. पाली भाषेतील काही शब्द मुद्दामच
ठेवले आहेत जेणेकरून त्या भाषेचा थोडा आनंद वाचकांस घेता येईल. पाली
सुत्तांमध्ये शिकवणुकीचा भाग म्हणून अनेक वाक्ये वारंवार फक्त एखादा शब्द बदलून
येतात. हे भाषांतर शब्दशः असल्याने अशी वाक्ये
त्यात येतील परंतु वाचकाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये.
भाषांतर
“भिक्खुहो, मीसुद्धा
बोधिप्राप्तीपूर्वी बोधिसत्व असताना स्वतःला जन्माला येणारा असा जातिधर्मी समजून त्याचाच
विचार करत असे, स्वतःला
वार्धक्यधर्मी समजून फक्त त्याचाच विचार करत असे, स्वतःला व्याधिधर्मी --- स्वतःला मरणधर्मी
-- स्वतःला शोकधर्मी -- स्वतःला सङ्क्लेशधर्मी
समजून फक्त त्याचाच विचार करत असे. तेव्हा
माझ्या मनात विचार आला की, मी असे स्वतःला जातिधर्मी, वार्धक्यधर्मी, व्याधिधर्मी, मरणधर्मी, शोकधर्मी,
सङ्क्लेशधर्मी समजून फक्त त्याचाच विचार का करतो आहे? त्यापेक्षा,
स्वतःला जातिधर्मी मानून त्यात काय दोष आहेत ते समजून घेऊन, स्वतःला वार्धक्यधर्मी, व्याधिधर्मी, इ. मानून त्यात काय दोष आहेत ते समजून घेऊन
अजात,
अजरामर, अनुत्तर आणि सर्वक्षेम अशा
निर्वाणाचा शोध का घेऊ नये?
"भिक्खुहो,
जेव्हा मी प्रथमच वयप्राप्त झालो, अशा तारूण्यावस्थेत की जेव्हा माझे केस अतिशय काळेभोर[1]
होते, तेव्हा मी कुठलीही इच्छा न करता, आई-वडिलांना अश्रूपूर्णावस्थेत सोडून स्वतःचे केस उतरवून काषाय वस्त्र अंगावर चढवून
घर सोडून बेघर होऊन प्रव्रज्या घेतली. प्रव्रजित झाल्यावर 'किङ्कुसलगवेसी' [2]
बनून अनुत्तर अशा शांतीपदाच्या शोधार्थ मी असताना आळार
कालामांकडे पोहोचलो. तेथे पोहोचल्यावर
त्यांना म्हणालो - "आयुष्मान कालाम, आपण शिकवत असलेला धर्मविनय
शिकण्याची माझी इच्छा आहे”.
भिक्खुहो,
मी असे म्हटल्यावर आळार कालाम मला म्हणाले – “जरूर आयुष्मान, माझा हा धर्म तुझ्यासारखा हुशार माणूस
त्याचा स्वतः अनुभव घेऊन थोड्याच वेळात त्याला आत्मसात करेल”. भिक्खुहो, अल्पशा वेळातच मी तो आत्मसात करून 'मला हा धर्म समजला, कळाला'
असे मला वाटायला लागले. त्या वेळेस मी विचार केला की, असे तर नाही ना की आळार कालाम
फक्त नाममात्र 'मी ह्या धर्माचा साक्षात्कार करून त्याची साधना करतो' असे
म्हणतात. काय खरेच ते त्यांचा धर्म पूर्ण जाणून
त्याची साधना करतात का?
"भिक्खुहो, मग मी आळार कालामांकडे गेलो आणि म्हणालो - 'तुम्ही ह्या धर्माचा किती खोलात जाणून साक्षात्कार केला आहे?' ह्यावर आळार कालामांनी आकिञ्चन्यायतनाचा [3]उपदेश
केला. तेव्हा मला असे वाटू लागले की, फक्त आळार कालामांकडेच श्रद्धा, परिश्रम, स्मृति, समाधि आणि प्रज्ञा नाही तर माझ्याकडेही ह्या सर्व गोष्टी
आहेत. मी ह्या आळार कालामांच्या धर्माचा पूर्ण
अभ्यास करून त्याचा साक्षात्कार का करुन घेऊ नये? अशा प्रकारे विचार करून काही वेळातच मी त्या धर्माचा संपूर्ण साक्षात्कार करून
घेतला आणि त्याची साधना करू लागलो.
“ह्यानंतर भिक्खुहो, मी
पुन्हा आळार कालामांकडे गेलो आणि म्हणालो - 'आयुष्मान
कालाम,
आपण एवढेच शिकवता का?' 'हो
आयुष्मान,
मी हा धर्म स्वतः येवढाच जाणून साक्षात्कार करून त्याची
साधना करतो. तुम्ही देखील त्याचा साक्षात्कार केला हा
आमचा मोठाच लाभ आहे. मी जेवढा धर्म जाणला आहे तेवढाच तुम्हीही जाणला
आहे. आता, जसा
मी तसेच तुम्ही. आयुष्मान,आपण
दोघेही ह्या सङ्घाला शिकवू'.
भिक्खुहो,
अशा प्रकारे आळार कालामांनी स्वतः आचार्य असूनही
माझ्यासारख्या शिष्याला समान वागवून माझा सत्कार केला. तेव्हा मी विचार केला की - हा धर्म काही परमशान्ती, इन्द्रियनिरोध, सम्बोधि आणि निर्वाणप्राप्तीसाठी पुरेसा नाही' म्हणून
भिक्खुहो,
तो धर्म मी न स्वीकारता मी तिथून निघालो.
भिक्खुहो, अशा प्रकारे 'किङ्कुसलगवेसी' बनून
अनुत्तर अशा शांतीपदाच्या शोधार्थ मी असताना उद्दक रामपुत्तांकडे पोहोचलो. तेथे पोहोचल्यावर त्यांना म्हणालो - "आयुष्मान, आपण शिकवत असलेला धर्मविनय शिकण्याची माझी इच्छा आहे”. भिक्खुहो,
मी असे म्हटल्यावर उद्दक रामपुत्त मला म्हणाले – “जरूर आयुष्मान, माझा हा धर्म तुझ्यासारखा हुशार माणूस
त्याचा स्वतः अनुभव घेऊन थोड्याच वेळात त्याला आत्मसात करेल”. भिक्खुहो, अल्पशा वेळातच मी तो आत्मसात करून 'मला हा धर्म समजला, कळाला'
असे मला वाटायला लागले. त्या वेळेस मी विचार केला की, असे तर नाही ना की उद्दक
रामपुत्त फक्त नाममात्र 'मी ह्या धर्माचा साक्षात्कार
करून त्याची साधना करतो' असे म्हणतात. काय खरेच ते त्यांचा धर्म पूर्ण जाणून त्याची साधना करतात का?
"भिक्खुहो, मग मी उद्दक रामपुत्तांकडे गेलो आणि म्हणालो - 'तुम्ही ह्या धर्माचा किती खोलात जाणून साक्षात्कार केला आहे?' ह्यावर उद्दक रामपुत्तांनी नेवसञ्ञानासञ्ञायतनाचा [4]
उपदेश केला. तेव्हा मला असे वाटू लागले की, फक्त उद्दक रामपुत्तांकडेच श्रद्धा, परिश्रम, स्मृति, समाधि आणि प्रज्ञा नाही तर माझ्याकडेही ह्या सर्व गोष्टी
आहेत. मी ह्या उद्दक रामपुत्तांच्या धर्माचा
पूर्ण अभ्यास करून त्याचा साक्षात्कार का करुन घेऊ नये? अशा प्रकारे विचार करून काही वेळातच मी त्या धर्माचा संपूर्ण साक्षात्कार करून
घेतला आणि त्याची साधना करू लागलो.
“ह्यानंतर भिक्खुहो, मी
पुन्हा उद्दक रामपुत्तांकडे गेलो आणि म्हणालो - 'आयुष्मान
राम,
आपण एवढेच शिकवता का?' 'हो
आयुष्मान,
मी हा धर्म स्वतः येवढाच जाणून साक्षात्कार करून त्याची
साधना करतो. तुम्ही देखील त्याचा साक्षात्कार केला हा
आमचा मोठाच लाभ आहे. मी जेवढा धर्म जाणला आहे तेवढाच तुम्हीही जाणला
आहे. आता, जसा
मी तसेच तुम्ही. आयुष्मान,आपण
दोघेही ह्या सङ्घाला शिकवू'.
भिक्खुहो,
अशा प्रकारे उद्दक रामपुत्तांनी स्वतः आचार्य असूनही
माझ्यासारख्या शिष्याला समान वागवून माझा सत्कार केला. तेव्हा मी विचार केला की - - हा धर्म काही परमशान्ती, इन्द्रियनिरोध, सम्बोधि आणि निर्वाणप्राप्तीसाठी पुरेसा नाही' म्हणून
भिक्खुहो,
तो धर्म मी न स्वीकारता मी तिथून निघालो.
“भिक्खुहो, अशा
प्रकारे 'किङ्कुसलगवेसी' बनून अनुत्तर अशा शांतीपदाच्या शोधार्थ मी
असताना क्रमश: फिरत मगध प्रांती उरूवेला गावी येऊन पोहोचलो. मी तिथे असलेला रमणीय भूमीभाग, आल्हाददायक
वनश्री,
वाहणारी नदी व तिचे समतल दोन्ही तट आणि सुंदर अशी हरित कुरणे
बघितली. भिक्खुहो, तेव्हा
मी विचार केला की - 'किती रमणीय अशी ही भूमी आहे, चहुकडे आल्हाददायक वने, वाहणारी आणि समतल तट असलेली
नदी आणि हरित कुरणे आहेत. ही
जागा आपल्या साधनेसाठी योग्य आहे' असा विचार
करून तिथेच साधनेसाठी बसलो.
–
क्रमशः --